कॅनडानं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोर म्हणजेच IRGC या इराणी सशस्त्र दलाच्या शाखेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री डॉमिनिक लेब्लँक यांनी काल ही घोषणा करताना सांगितलं की कॅनडा IRGC च्या दहशतवादी कारवायांचा सामना करण्यासाठी सर्व उपाय लागू करेल. IRGC सदस्यांसह हजारो वरिष्ठ इराणी सरकारी अधिकाऱ्यांना आता कॅनडामध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे आणि जे आधीच देशात आहेत त्यांची चौकशी करून त्यांना बाहेर काढले जाऊ शकते. बँका आणि ब्रोकरेज यांसारख्या कॅनेडियन वित्तीय संस्थांना, या संस्थेची मालमत्ता ताबडतोब गोठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि कॅनडा आणि परदेशातील कॅनेडियन लोकांसाठी जाणूनबुजून या संस्थेच्या मालमत्तेबाबत व्यवहार करणे हा फौजदारी गुन्हा ठरणार आहे. धर्मादाय संस्थांनी या दहशतवादी गटांशी त्यांचे संबंध कायम ठेवल्यास त्यांचा दर्जा काढून घेतला जाईल आणि त्या गटांशी संबंधित असलेल्या लोकांना कॅनडामध्ये प्रवेश नाकारला जाऊ शकतो.