नीट ची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थीच्या हिताला धक्का पोहोचणार नाही याची काळजी केंद्र सरकार घेईल, असं आश्वासन आज केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलं. विद्यार्थ्यांच्या समस्या समभावाने आणि सुयोग्य पद्धतीने सोडवू असं ते म्हणाले. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार केंद्र सरकार कार्यवाही करेल असंही ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर कडक शब्दात टीका केली आहे. २४ लक्ष विद्यार्थ्यांच्या आशा सरकारनं धुळीला मिळवल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवर टाकलेल्या पोस्ट मध्ये म्हंटल आहे.
वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत पेपरफुटी आणि अन्य गैरप्रकार झाल्याचा आरोप करत त्याची चौकशी केंद्रीय अन्वेषण संस्थेमार्फत करण्याची मागणी करणाऱ्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा संस्था तसंच केंद्र सरकारला नोटिसा बजावल्या आहेत. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या सुट्टीकालीन पीठाने सीबीआय आणि बिहार राज्यसरकारकडूनही जबाब मागितला असून त्याकरता दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.