कोल्हापूरातल्या ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री आग लागली. या आगीमुळे जीवितहानी झाली नाही, मात्र आगीत नाट्यगृहाचा रंगमंच जळून खाक झाला. नाट्यगृहाचा काही भाग तसंच छतही कोसळलं आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. नाट्यगृहाचा बहुतांश भाग लाकडाचा असल्यामुळे आग भराभर पसरली. केशवराव भोसले यांची आज १३४ वी जयंती आहे, या दिवसाच्या पूर्वसंध्येलाच अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हे नाट्यगृह नव्याने उभारण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू अशी ग्वाही कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली. त्यांनी आज दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. राजर्षी शाहू महाराजांनी रोममधल्या नाट्यगृहाच्या धर्तीवर बांधलेलं हे नाट्यगृह म्हणजे कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा आहे असं सांगून नाट्यगृहाच्या बांधणीसाठी आणि त्याला पूर्वीचं वैभव प्राप्त करुन देण्यासाठी शासनस्तरावर निधी मिळवण्याचा प्रयत्न करु, असंही मुश्रीफ यांनी सांगितलं. आगीच्या घटनेची चौकशी होईल असंही ते म्हणाले.