भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर येत्या आर्थिक वर्षात ६ पूर्णांक ७ दशांश टक्के राहील, असा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे. जागतिक अर्थव्यवस्थांबद्दलचा जागतिक बँकेचा अहवाल काल प्रसिद्ध झाला, त्यात म्हटलंय की चालू आर्थिक वर्षातला वाढीचा दर साडेसहा टक्के राहण्याची शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षात हा दर ८ पूर्णाक २ दशांश टक्के होता.
आगामी वर्षात सेवा क्षेत्रात सातत्यपूर्ण वाढ दिसेल, तर सरकारी पाठबळाच्या आधारावर उद्योगक्षेत्र ६ पूर्णांक ७ दशांश टक्के दराने वाढेल, असं या अहवालात नमूद केलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा जीडीपी वाढीचा दर २ पूर्णांक ७ दशांश टक्क्यांवर राहील, असा अंदाज आहे. २०२६मधे भारत जगातली सर्वात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल, त्याखालोखाल चीन आणि अमेरिकेचा क्रमांक असेल, असा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे.