डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजने’ची घोषणा

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी सरकारनं मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात केली. यात 44 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या साडे ७ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या  शेतीपंपांना पूर्णत: मोफत वीज पुरवली जाईल. याशिवाय मागेल त्याला सौरउर्जा पंप देण्याची योजनाही सरकारनं जाहीर केली. साडे 8 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला जाईल. नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्‍यासाठी ई-पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू होणार आहे. 

 

गाव तेथे गोदाम योजनेची घोषणा सरकारनं केली असून यात पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामांचे बांधकाम आणि दुरुस्ती केली जाईल. कांदा आणि कापसाची हमी भावानं खरेदी करण्यासाठी प्रत्येकी २०० कोटी रुपयांच्या फिरता निधी सरकार निर्माण करणार आहे. 

 

दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान देण्याची योजना जुलै, 2024 पासून पुढेही चालू राहील, असंही आजच्या अर्थसंकल्पात जाहीर झालं. 

 

अटल बांबू समृद्धी योजनेतून 10 हजार हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबूची लागवड करण्याचा मानस सरकारनं जाहीर केला आहे. यात प्रतिरोपासाठी 175 रूपये अनुदान दिलं जाणार असून पहिल्या टप्प्यात नंदुरबार जिल्ह्यात 1 लाख 20 हजार एकर क्षेत्रावर बांबूची लागवड होणार आहे. 

 

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींना दिली जाणारी नुकसान भरपाई ५ लाखांनी वाढवून २५ लाख रुपये सरकारनं केली आहे. अपंगत्व आलेल्यांना तसंच जखमी झालेल्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानंही अडीच ते पावणे ४ लाख रुपयांची वाढ करण्याची घोषणा आज झाली. 

 

विविध सिंचन प्रकल्प पूर्ण करणं, प्रकल्पांच्या वितरण प्रणालीत सुधारणा करणं यासाठीही विविध उपाययोजना सरकारनं जाहीर केल्या आहेत. 

 

कोल्हापूर-सांगलीतलं अतिरीक्त पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्यानं ३ हजार २०० कोटी रुपयांचा कार्यक्रम सरकार राबवणार आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा