बहुपैलू चित्रकर्मी राजकपूर यांच्या कुटुंबीयांनी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. राज कपूर यांची जन्मशताब्दी चौदा डिसेंबरला आहे. त्या निमित्तानं चाळीस शहरांमध्ये तेरा ते पंधरा डिसेंबर या काळात राज कपूर चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला असून, त्यासाठी कपूर कुटुंबीयांनी पंतप्रधानांना आमंत्रण दिलं. राज कपूर यांनी जगाला भारताचं महत्त्व दाखवून दिलं असं पंतप्रधानांनी या प्रसंगी सांगितलं. राज कपूर यांचा करिष्मा मध्य आशियात अजूनही कायम असून, त्यांच्या जीवनावर चित्रपट बनवावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. मध्य आशियात भारतीय चित्रपटांसाठी खूप संधी असून, ती साधण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. तत्कालीन जनसंघाला निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर त्या पक्षाच्या नेत्यांनी राज कपूर यांचा फिर सुबह होगी हा चित्रपट बघण्याचं ठरवलं अशी आठवण मोदी यांनी सांगितलं आणि या पक्षानं आता पहाट बघितली आहे, अशीही पुस्ती जोडली.
Site Admin | December 12, 2024 10:40 AM | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी | राजकपूर कुटुंबीय