वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचं आर्थिक चित्र बदलणार असून वाढवण बंदराच्या पायाभरणीचा दिवस हा देशाच्या प्रगतीच्या वाटचालीतला ऐतिहासिक दिवस आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदराच्या पायाभरणीसह अन्य विकासकामांचं उद्घाटन आणि भूमीपूजन काल पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पुतळा दुर्घटनेबाबत खेद व्यक्त केला आणि शिवरायांची तसंच शिवभक्तांची माफी मागितली. गेल्या दशकात देशाच्या किनारपट्टीवरील भागाच्या विकासानं अभूतपूर्व गती घेतली आहे असं मोदी यांनी सांगितलं. आज सगळं जग वाढवण बंदराकडे अपेक्षेनं पाहात असल्याचं सांगत पंतप्रधान म्हणाले…….
या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते स्थानिक मासेमारांना बोटीवर लावण्याच्या ट्रान्स्पाँडर अर्थात संपर्क व्यवस्था साधनांचं वितरण करण्यात आलं. इस्रोनं विकसित केलेले हे ट्रान्स्पाँडर देशातल्या 1 लाख बोटींवर लावले जाणार आहेत. यावेळी मोदींच्या हस्ते काही मासेमारांना किसान क्रेडिट कार्डचंही वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रिय जहाजबांधणी, बंदर आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. वाढवण बंदर राज्यासाठी प्रगतीचं नवं शिखर ठरेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तर वाढवण बंदरामुळे आत्मनिर्भर आणि विकसित भारतात महाराष्ट्राची भूमिका आणखी मजबूत होईल, असं केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितलं.