राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभाराचा प्रस्ताव आज विधानपरिषदेनं एकमताने मंजूर केला. तत्पूर्वी, या प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी उत्तर दिलं. राज्याची अर्थव्यवस्था वेगानं वाढत असून गुंतवणुकीच्या बाबतीतही राज्य अग्रेसर आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेनं अर्धा ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केला आहे आणि एक ट्रिलियन डॉलरचं ध्येय पुढच्या ३ ते ५ वर्षांत गाठण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शक आराखडा तयार असल्याचं त्यांनी सांगितलं.
महायुती सरकारनं नोकरभरतीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं राबवत सव्वा दोन वर्षांत एक लाख लोकांना सरकारी नोकरी देण्याचा विक्रम केल्याचं सांगून, या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षांमध्ये पेपरफुटीचा एकही गुन्हा नोंदवला गेलेला नाही, असं फडनवीस यांनी सांगितलं.
वाढवण बंदर महाराष्ट्राच्या विकासात मोठी भूमिका बजावेल, ते तयार करताना मासेमार आणि स्थानिकांचं कोणतंही नुकसान होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यानंतर या प्रस्तावावर मतदान घेण्यात आलं आणि आवाजी मतदानाने एकमताने प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ एका घरातल्या जास्तीत जास्त दोनच महिलांना घेता येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही, अशी ग्वाही मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत दिली. वीस षटकांच्या विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचं अभिनंदन करण्याचा प्रस्ताव सभागृहानं एकमताने मंजूर केला.
Site Admin | July 3, 2024 7:57 PM | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस | विधानपरिषद
राज्याची अर्थव्यवस्था वेगानं वाढत असून गुंतवणुकीच्या बाबतीतही राज्य अग्रेसर आहे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस
