संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावरची चर्चा पुढे सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २३ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
देशात नोकऱ्यांची कमतरता नसून सरकारच्या विविध धोरणात्मक पावलांमुळे देशातला बेरोजगारीचा दर ३ पूर्णांक २ दशांश टक्क्यांपर्यंत खाली आल्याचं प्रतिपादन कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत केलं. प्रश्नोत्तराच्या तासाला पुरवणी प्रश्नांना ते उत्तर देत होते. येत्या काही वर्षांत बेरोजगारीचा दर ३ टक्क्यांच्या खाली येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. प्रधानमंत्र्यांच्या पॅकेजमुळे येत्या पाच वर्षांत ४ कोटीपेक्षा जास्त युवकांना रोजगार आणि कौशल्यविकासाच्या संधी मिळतील, असं सांगून त्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पाचं कौतुक केलं. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी दोन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.