केरळमधे वायनाड जिल्ह्यात काल दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या दोनशेच्या वर गेली आहे, तर १९१ लोक बेपत्ता आहेत. बचावकार्य आजही सुरू आहे. मुंडक्काई परिसरात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून अनेक मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. काही मृतदेह चलियार नदीतून वाहत येत असून ते बाहेर काढण्यात येत आहेत. जखमी झालेल्या १८६ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चुरालमाला इथं तात्पुरता पूल उभारण्याचे लष्कराचे प्रयत्न, सातत्यानं पडत असलेला जोरदार पाऊस आणि नदीच्या जोरदार प्रवाहामुळे दुपारी निष्फळ ठरले. संध्याकाळी पाऊस कमी झाल्यानंतर हे काम पुन्हा सुरु झालं.
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन यांनी आज दुर्घटनाग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांनीही आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसंच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.