देशाचं संविधान आपला दीपस्तंभ आणि मार्गदर्शक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा ११७वा भाग होता. देशाचं संविधान प्रत्येक कसोटीवर सिद्ध झालं असल्याचं ते म्हणाले. आपणही आज जे कोणी आहोत, ते संविधानामुळेच आहोत, असं ते म्हणाले.
येत्या २६ जानेवारीला देशात राज्यघटना लागू होऊन ७५ वर्षे पूर्ण होतील, त्यानिमित्तानं सुरू केलेल्या कॉन्स्टीट्यूशन सेव्हनटी फाईव्ह डॉट कॉम या संकेतस्थळाला युवा वर्गानं भेट द्यावी, नागरिकांनी राज्यघटनेची प्रास्ताविका वाचून त्याची ध्वनीचित्रफीत या संकेतस्थळावर अपलोड करावी असं आवाहन त्यांनी केलं.
येत्या १३ जानेवारीपासून उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी जोरदार तयारी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. हा एकतेचा महाकुंभ असून, या मेळ्याला भेट देणाऱ्या प्रत्येकानं एकतेचा संकल्प घेऊनच परत यावं, समाजातली फूट आणि द्वेषाची भावना नष्ट करण्याची शपथ घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं.
यावेळी प्रधानमंत्र्यांनी देशाच्या मनोरंजन क्षेत्राच्या योगदानाविषयी श्रोत्यांना सांगितलं. आपले ॲनिमेशनपट, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका जगभरात लोकप्रिय आहेत, त्यातून भारताच्या सर्जनशील उद्योगाची क्षमता दिसून येते असं ते म्हणाले. चित्रपट आणि मनोरंजन उद्योग क्षेत्रानं आशयघन निर्मितींच्या माध्यमातून एक भारत – श्रेष्ठ भारत ही भावना मजबूत केली असल्याचं सांगत, या क्षेत्राबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ..
होल्ड–बाईट–प्रधानमंत्री
२०२४ या वर्षात आपण चित्रपटसृष्टीतल्या अनेक महान व्यक्तींची १००वी जयंती साजरी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज कपूर मोहम्मद रफी, अक्किनेनी नागेश्वर राव गारू, तपन सिन्हा यांच्या कामगिराचा गौरव त्यांनी केला. पुढच्या वर्षी देशात पहिल्यांदाच वेव्हज् अर्थात जागतिक ध्वनी चित्र करमणूक शिखर परिषदेचं आयोजन होणार असल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. ही शिखर परिषद भारताची सर्जनशील प्रतिभा जगासमोर मांडण्याची मोठी संधी असल्याचं ते म्हणाले.
भारताच्या पारंपरिक कलांपासून आयुर्वेदापर्यंत आणि भाषांपासून संगीतापर्यंत असंख्य गोष्टींनी संपूर्ण जगाला व्यापलं आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. जगभरात भारतीय संस्कृतीची छाप कशी उमटली आहे, याविषयीची देशो देशीची उदाहरणंही त्यांनी आजच्या मन की बात मधून श्रोत्यांसमोर मांडली.
बस्तर इथं सुरू झालेल्या बस्तर ऑलिम्पिक या अभिनव स्पर्धेची माहिती देताना ते म्हणाले की या स्पर्धा म्हणजे विकास आणि खेळाचा संगम असून, युवा प्रतिभेचा आविष्कार आहे. आरोग्य क्षेत्रात भारतानं मिळवलेल्या यशाचा उल्लेख करताना त्यांनी मलेरिया विरोधातल्या लढ्याची देशाची कामगिरी श्रोत्यांसमोर मांडली. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार देशात २०१५ ते २०२३ या काळात मलेरियाचे रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ८० टक्के इतकी घट झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. देशवासियांनी एकत्रितपणे निर्धारानं या आव्हानाचा सामना केल्यानंच हे यश मिळाल्याचं ते म्हणाले.
कर्करोगाविरोधातल्या लढाईत आयुष्मान भारत योजना मोठी भूमिका पार पाडत असून, त्यामुळे ९० टक्के रुग्णांना वेळेत उपचार मिळू लागले असल्याचंही त्यांनी सांगितलं.
यावेळी प्रधानमंत्र्यांनी देशभरात शेतकऱ्यांनी छोट्या छोट्या सामुहिक प्रयत्नांतून मिळवलेल्या यशाची उदाहरणही श्रोत्यांसमोर मांडत, छोट्या सुरुवातीमधूनच मोठं परिवर्तन शक्य असतं, आपल्याला केवळ दृढ संकल्प आणि सांघिक भावनेची गरज अधोरेखित केली.
नव्या वर्षात मन की बातच्या माध्यमातून आणखी प्रेरणादायी प्रयत्न सामायिक करण्याचं वचन देत, प्रधानमंत्र्यांनी सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.