आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणं आणि देशात जातनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिलं आहे. राज्यघटना वाचवण्यासाठी हे दोन सर्वांत महत्त्वाचे मार्ग असल्याचं त्यांनी कोल्हापूर इथं संविधान सन्मान संमेलनात सांगितलं. जातनिहाय जनगणना हा देशाचा एक्स-रे आहे आणि यासंबंधीचा कायदा आम्ही संसदेत मंजूर करून दाखवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
तत्पूर्वी, कोल्हापुरातल्या कसबा बावडा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण राहुल गांधी यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं आजच्या काळातलं प्रतीक म्हणजे भारताची राज्यघटना आहे. ही विचारधारा महाराष्ट्राच्या मातीनं, जनतेनं घडवलेली आहे. शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारातून राज्यघटना साकारली असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. शिवरायांच्याच विचारधारेचा संघर्ष आज राज्यघटना संपवू पाहणाऱ्या विचारधारेशी सुरू आहे, असं त्यांनी नमूद केलं.