पुढच्या आठवड्यात सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार नवीन सहा विधेयकं सादर करणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये काही सुधारणा सुचवणाऱ्या विधेयकासह अर्थविषयक विधेयकांचा यामध्ये समावेश आहे. विमान कायदा १९३४ ला पर्याय म्हणून वायुयान विधेयक २०२४ मांडण्यात येणार असून नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात व्यवसाय करणं सुलभ व्हावं यासाठी त्यात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. लोकसभा सचिवालयानं काल या आगामी विधेयकांची सूची जाहीर केली.
येत्या २२ जुलै रोजी संसदेचं अधिवेशन सुरु होणार असून ते १२ ऑगस्टपर्यंत चालेल.२३ जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरामन अर्थसंकल्प सादर करतील. इतर विधेयकांमध्ये बॉयलर विधेयकाचा समावेश असून स्वातंत्र्यपूर्व काळातल्या कॉफी आणि रबर कायद्याला पर्याय म्हणून ते मांडण्यात येणार आहे. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज सल्लागार समिती स्थापन केली असून ही समिती संसदेच्या दैनंदिन कामकाजाचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याचं काम करेल. बिर्ला यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीमध्ये अनुराग ठाकूर, अरविंद सावंत, सुदीप बंदोपाध्याय,निशिकांत दुबे, गौरव गोगोई, दयानिधी मारन, बैजयंत पांडा आदी सदस्यांचा समावेश असून, समितीनं कालपासून काम सुरु केलं.