सोयाबीन आणि कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी, तसेच निर्यातीला परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारनं अनुकूलता दर्शवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत ही माहिती दिली.
विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कठोर भूमिका घेतली असून त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसतील, असं त्यांनी सांगितलं. राज्यात ११ हजार ५०० मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचं उद्दीष्ट असल्यानं कृषीपंपांना दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. महात्मा जोतीराव फुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत, कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यातले अडथळे या महिनाअखेरपर्यंत दूर केले जातील, असं ते म्हणाले. ऊसाचा एमएसपी वाढवून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं अजीत पवार यांनी सांगितलं.
केंद्रीय पणन, सहकार, कृषीमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.