डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात सर्वत्र गणेशविसर्जनाचा उत्साह

भाद्रपद महिन्यात गणेशचतुर्थी पासून सुरु झालेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. त्यामुळं लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी येण्याचं आमंत्रण देत वाजत गाजत निरोप देण्याची चढाओढ राज्यात सर्वत्र दिसून येते आहे.

मुंबईत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सकाळपासून विसर्जन मिरवणुका काढण्यात येत आहेत. ढोल ताशा लेझीम आणि बाजाच्या संगीतावर उत्फुल्लपणे सर्वजण गुलालाची, फुलांची उधळण करीत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. लालबागचा राजा, तेजुकाया मॅन्शन, गणेशगल्ली इत्यादी प्रसिद्ध मंडळांच्या महाकाय मूर्ती मिरवणुकीने निघाल्या आहेत. विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. महापालिकेचे सुमारे १२ हजार अधिकारी – कर्मचारी विसर्जन स्थळांवर तैनात आहेत. गिरगाव, दादर, जुहू इत्यादी समुद्रकिनाऱ्यांसह ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांवर विसर्जन सुरू आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २२ नैसर्गिक आणि १३७ कृत्रिम अशा १५९ विसर्जन स्थळांवर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तीचं विसर्जन सुरू आहे. जालना इथल्या मोती तलावात सकाळपासूनच गणेश मूर्ती विसर्जनासाठी गर्दी दिसून येत आहे. महापालिकेने लहान मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम हौदाची निर्मिती केली असून मोठ्या मूर्ती क्रेनच्या मदतीने विसर्जित केल्या जात आहेत. गोंदिया शहरात पर्यावरण पूरक पद्धतीनं गणेशमूर्तींचं विसर्जन सुरू आहे. नगर परिषदेच्या वतीने विसर्जन ठिकाणी निर्माल्य गोळा करण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.  

नागपूरमधे महापालिका प्रशासनाने मूर्तीच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. शहरात ३४ ठिकाणी मूर्तींचे विसर्जन होत आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा