७८वा स्वातंत्र्यदिन आज देशभरात उत्साहाने साजरा होत आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधे सरकारी-निमसरकारी कार्यालयं, लोकप्रतिनिधीगृहं, न्यायालयं, सहकारी संस्था, शाळा महाविद्यालयं तसंच अनेक स्वयंसेवी संस्था संघटनांनी ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित केले होते.
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना तसंच देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांप्रति आदर भावना व्यक्त करीत आणि राष्ट्रगीत म्हणत साऱ्या देशाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. बाजारपेठांमधे तिरंगा झेंड्याच्या लहानमोठ्या प्रतिकृती जिकडेतिकडे दिसत आहेत.
अनेक ठिकाणी दुकानं, इमारती, रस्ते यावर तिरंगी सजावट करण्यात आली आहे.स्वातंत्र्यदिनानिमीत्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी नवी दिल्ली इथल्या अमरज्योती या शहीद स्मारकाला भेट देऊन, शहिदांना श्रद्धांजली वाहिली.