२१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचं आयोजन १० ते १६ जानेवारी या कालावधीत मुंबई आणि ठाण्यात होणार आहे. कान चित्रपट महोत्सवात अ-सर्टन विभागात सर्वोत्तम ठरलेल्या ‘द ब्लॅक डाॅग’ या चायनीज चित्रपटानं या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. महोत्सवात आशियाई विभागात चीन, भूतान, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया, कझाकिस्तान, ट्युनिशिया, जपान, इराण, दक्षिण कोरिया आणि श्रीलंका या देशातल्या चित्रपटांचा समावेश आहे. भारतीय चित्रपट विभागात मल्याळम, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी या भाषांमधल्या अकरा चित्रपटांचा समावेश आहे.
मराठी स्पर्धा विभागात आशा, सिनेमॅन , कर्मयोगी आबासाहेब , जिप्सी , भेरा, मॅजिक , मंडळ आभारी आहे , छबिला या ८ चित्रपटांचा समावेश आहे. या महोत्सवात सुप्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ देण्यात येणार असून आणि पत्रकार रफिक बगदादी यांना ‘सत्यजित राय मेमोरियल पुरस्कार’ देऊन सन्मानित केलं जाणार आहे. दिवंगत सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार चित्रपट अभ्यासक अनिल झणकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.