18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात समारोप झाला. यावेळी ‘The Golden Thread’ या माहितीपटाला आंतरराष्ट्रीय श्रेणीत सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लन यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शिका निशिता जैन यांना सुवर्ण शंख, 10 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. विविध श्रेणीत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या लघुपट आणि माहितीपटांनाही यावेळी गौरवण्यात आलं. महोत्सवाचे संचालक पृथूल कुमार म्हणाले की, या महोत्सवात सहभागी झालेल्या चित्रपटांची संख्या आणि प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद लक्षणीय होता. या महोत्सवाला सहाय्य करणाऱ्या चित्रपट प्रेमींचे, परीक्षकांचे, केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. ‘इंडिया इन अमरीतकाल’ या विशेष विभागात एडमन रॅनसन दिग्दर्शित लाइफ इन लूम या लघुपटाला सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार मिळाला. तर श्रीमयी सिंग यांना ‘अँड टूवर्ड्स हॅप्पी अलाइज’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ नवोदित दिग्दर्शकाचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार मिळाला. या समारोप कार्यक्रमाला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.