पुणे शहराची सांस्कृतिक शहर म्हणून ओळख कायम ठेऊन शहराचा विकास व्हावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते आज मुंबईत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत बोलत होते. यावेळी प्राधिकरणाच्या ३ हजार ८३८ कोटी ६१ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. ५ कोटी ७५ लाखांचा शिलकीचा हा अर्थसंकल्प आहे.
नवीन विकसित होणाऱ्या भागात मोकळ्या जागा राहतील, याची काळजी घ्या. पुण्यातलं कव्हेशन सेंटर जागतिक दर्जाचं होण्यासाठी नियोजन करा, गुंठेवारी अधिनियमातल्या नियमितीकरणाचं शुल्क कमी करुन नागरिकांना दिलासा द्या, हे शुल्क भरण्यासाठी ३१ मार्च पर्यंत विशेष सवलत द्या, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. प्राधिकरणाच्या १ हजार ६२० घरांची सोडत लवकरच काढण्याचे तसंच दुसऱ्या टप्प्यातल्या ६ हजार घरांच्या बांधकामाला वेग देण्याचे आदेश त्यांनी दिले.