दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस काल जगभरात मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिनाचा मुख्य कार्यक्रम जम्मू आणि काश्मीर मधील श्रीनगर इथं शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात संपन्न झाला. यावेळी मोदी यांनी आपल्या भाषणात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये योगाभ्यासाचे महत्त्व स्पष्ट केले. योगाभ्यास ही आत्मोन्नतीचे सर्वोत्तम साधन असल्याचं आपल्या भाषणात नमूद केलं. योग ही जगभरातील विविध संस्कृतीतील आणि विविध पार्श्वभूमी असलेल्या लोकांना एकत्र आणणारी शक्ती असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. योगाभ्यासामध्ये तरुण पिढी मोठ्या उत्साहाने आणि निष्ठेने सहभागी होत असल्याचं पाहून आनंद वाटत असल्याचं ही त्यांनी नमूद केलं. यासंदर्भात, काल समाज माध्यमावर प्रसारित केलेल्या संदेशात मोदी म्हणाले की, दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात मोठ्या प्रमाणावर साजरा केला गेला. योगाभ्यासामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींचे, समुदायाचे आणि संस्थांचे त्यांनी आभार मानले. योगाभ्यासाला प्रसिद्धी देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्वांचे त्यांनी यावेळी आभार मानले. हे प्रयत्न एकजूट आणि परस्पर सौहार्द भावना वाढीस लागण्यासाठी दीर्घकाळ परिणामकारक ठरतील अशी भावना पंतप्रधानांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. योग क्षेत्रातील प्रशिक्षकांची वाढती संख्या पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. अशा प्रशिक्षकांमुळेच इतरांना योगाभ्यासाठी प्रेरणा मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या काळात योगच्या माध्यमातून जग जवळ येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
Site Admin | June 22, 2024 9:35 AM | #IDY2024 #YogaForSelfAndSociety #InternationalYogaDay2024 | आंतरराष्ट्रीय योग दिवस
दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा
