थायलंड आणि म्यानमारमध्ये आज झालेल्या भूकंपामुळे बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली एक इमारत कोसळून किमान तीन जण मृत्यूमुखी पडले, तर सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे. अद्याप ९० जण बेपत्ता आहेत. ७ पूर्णांक ७ रिख्टर स्केलच्या या भूकंपाचं केंद्र म्यानमारमधल्या मंडालेजवळ होतं. या दुर्घटनेनंतर म्यानमार सरकारनं सहा प्रांतांमध्ये आणीबाणी लागू केली आहे. या भूकंपामुळं मंडाले इथल्या ऐतिहासिक ठिकाणांचं मोठं नुकसान झालं आहे. या भूकंपाचे हादरे चीनच्या युनान आणि सिचुआन प्रांतातही जाणवले आणि यात काहीजण जखमी झाले आहेत, तसंच मालमत्तेचंही नुकसान झालं आ
थायलंड आणि म्यानमारला आज ७ पूर्णांक ७ आणि ६ पूर्णांक ४ रिख्टर स्केलच्या भूकंपाचे दोन मोठे धक्के बसले. म्यानमारच्या सागाइंग इथं केंद्र असलेल्या या भूकंपाचे धक्के ९०० किलोमीटर दूर, थायलंडची राजधानी बँकॉकमध्येही जाणवले. बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली एक मोठी इमारत कोसळली. यात किमान तीन जण ठार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर म्यानमारमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या भूकंपामुळं झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी थायलंडच्या प्रधानमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या भूकंपाचे सौम्य धक्के कोलकाता आणि इम्फाळमध्येही जाणवले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थायलंड आणि म्यानमारबद्दल काळजी व्यक्त केली आहे. समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे मोदी यांनी इथल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली आहे. या दोन्ही देशांना शक्य ती सगळी मदत करायला भारत तयार असल्याचं सांगून त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला म्यानमार आणि थायलंड सरकारशी संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या आहेत. थायलंडमधला भारताचा दूतावास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अद्याप कोणत्याही भारतीय नागरिकाला या दुर्घटनेत इजा झाल्याची माहिती नाही. थायलंडमधल्या भारतीय नागरिकांसाठी भारतीय दूतावासाने इमर्जन्सी क्रमांक जाहीर केला आहे.
दरम्यान, बांगलादेशच्या विविध भागातही आज ७ पूर्णांक ३ रिख्टरच्या भूकंपाचे हादरे बसले. जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप आलेलं नाही.