भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात, तिसऱ्या दिवसअखेर विजयासाठी ५३४ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ३ बाद १२ धावा झाल्या आहेत.
आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतानं आपल्या दुसऱ्या डावात कालच्या बिनबाद १७२ या धावसंख्येत आणखी ३१५ धावांची भर घालत ६ बाद ४८७ या धावसंख्येवर डाव घोषित केला. पहिल्या डावात भारतानं ४६ धावांची आघाडी मिळवली होती.
काल ९० धावांवर नाबाद असलेल्या यशस्वी जयस्वालनं शतक पूर्ण करत १६१ धावांची खेळी केली, तर एक के.एल. राहुल ७७ धावा करून बाद झाला. या दोघांनी सलामीसाठी २०१ धावांची भागिदारी केली. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीनंही कसोटी क्रिकेट कारकिर्दीतलं ३० वं शतक झळकावत नाबाद १०० धावांची खेळी केली.
विजयासाठी ५३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियालाची फलंदाजी गडगडली. जसप्रित बुमराहनं २, तर मोहम्मद सिराजनं १ गडी बाद केला. आजचा खेळ थांबला, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या ३ बाद १२ धावा झाल्या होत्या.