भारतीय क्रिकेट संघातील वरच्या फळीतील फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताला 24 वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमवावी लागली. 2000 नंतर पहिल्यांदा भारतीय संघाला देशात झालेल्या कसोटी मालिकेतला एकही सामना जिंकला आलेला नाही. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मुंबईत वानखेडे मैदानावर झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा 25 धावांनी पराभव केला, आणि मालिका 3-0 अशी जिंकली.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी काल सकाळच्या सत्रात न्यूझीलंडचा दुसरा डाव 174 धावांवर आटोपला. रविंद्र जडेजानं दोन्ही डावांत प्रत्येकी 5 गडी बाद करत, सामन्यात एकंदर 10 बळी घेतले. भारतासमोर विजयासाठी 147 धावांचं आव्हान होतं. मात्र न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांसमोर भारताची फलंदाजी कोलमडल्याने भारताचा दुसरा डाव 121 धावांत संपुष्टात आला. 64 धावा करणाऱ्या ऋषभ पंतशिवाय कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. न्यूझीलंडच्या एजाज पटेल यानं दुसऱ्या डावात भारताचे 6 गडी बाद करत सामन्यात 11 बळी टिपले. पटेल सामनावीर तर न्यूझीलंडचा संयमी फलंदाज विल यंग मालिकावीर ठरला.