महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात आणि जगभरातील अनेक देशातही कालपासून गणेशोत्सवाच्या चैतन्यपर्वाचा प्रारंभ झाला. 64 कलांचा अधिपती, बुद्धिदात्या गणेशाचं काल सर्वत्र वाजत गाजत आगमन झालं. पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवाला ढोल ताशांच्या गजरात, उत्साहात सुरुवात झाली. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती या पाच मानाच्या गणपतींची पारंपरिक पद्धतीनं विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मुंबई आणि उपनगरातही ढोलताशांच्या गजरात विविध मंडळांच्या गणपतीचं आगमन झालं. प्रभादेवीचा सिद्धीविनायक, लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. कोकणात घरोघरी गणेशोत्सवाला काल उत्साहात आणि भक्तीभावानं मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. राज्यभरात सर्वत्र घरगुती तसंच सार्वजनिक मंडळांमध्ये काल गणरायाचं जल्लोषात आगमन झालं. श्रीनगरमधील लाल चौकातल्या पंच हनुमान मंदिरात गणेशमूर्तीची कायमस्वरूपी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सीमेवरसंरक्षण करणारे जवान, काश्मीरमधील मराठीबांधवांच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठापना सोहळा शुक्रवारी पार पडला.
Site Admin | September 8, 2024 11:36 AM | Ganpati Festival