हिमाचल प्रदेशात झालेल्या हिमवृष्टीनंतर तापमानात प्रचंड घट झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान शून्याच्या खाली पोहोचलं असून लाहौल स्पिती जिल्ह्यात केलांग इथे सर्वात कमी उणे ११ पूर्णांक ८ शतांश अंश सेल्सियस इतकं नोंदवण्यात आलं आहे. मनाली जिल्ह्यात आज सूर्यदर्शन झालं असलं तरी अनेक ठिकाणी धुकं पसरलं आहे. हिमवृष्टी आणि भूस्खलनामुळे चार राष्ट्रीय महामार्गांसह ४०० रस्ते बंद झाले आहेत. वीजपुरवठाही खंडित झाला असून मदत पोहोचवण्यासाठी अडथळे येत आहेत. हवामान विभागाने पुढच्या २४ तासात मुसळधार पाऊस आणि पुन्हा हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
मध्य प्रदेशात पूर्व आणि उत्तर भागात आज पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र, इंदूर, उज्जैन, ग्वाल्हेर, चंबळ, सागर आणि रीवा भागामध्ये पुढचे तीन ते चार दिवस उष्णतेची लाट येऊ शकते, असा इशाराही दिला आहे. राजस्थानात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे तापमानाचा पारा घटला आहे. मात्र, गारपिटीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्याचे आदेशही दिले.