शिक्षक दिन हा शिक्षकांचं समर्पण, योगदान आणि मार्गदर्शनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं आयोजित क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात ते आज बोलत होते. खडू आणि छडीच्या जोरावर आयुष्याची शिडी चढायला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना मुख्यमंत्र्यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशात जीडीपीचं योगदान, प्रगतीचं केंद्र, परदेशी गुंतवणूक, स्वच्छता, उद्योग या सगळ्यात आपलं राज्य सर्वप्रथम आहे. आपलं राज्य शैक्षणिक दर्जातही सर्वोत्तम व्हावं यासाठी आपण साऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या दृष्टीनं सरकार नेहमीच प्रयत्नशील राहील असंही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी त्यांनी सर्व पुरस्कार विजेत्या शिक्षकांचं अभिनंदन केलं. या कार्यक्रमात १०९ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये प्राथमिक विभागातले ३८ शिक्षक, माध्यमिक विभागातले ३९ शिक्षक, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे १६ शिक्षक, कला आणि क्रीडा क्षेत्रातले २ विशेष शिक्षक, दिव्यांग किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतले एक आणि स्काऊट गाईड मधले दोन तसंच ८ शिक्षिकांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्यात आले.