राज्याला ७२० किलोमीटर लांबीचे नैसर्गिक सौंदर्य लाभलेले अनेक समुद्रकिनारे लाभले आहेत. जगभरातले पर्यटक देखील स्वच्छ किनाऱ्यांना पसंती देतात. हे किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. मुंबईत जुहू चौपाटी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेवेळी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनाच्या निमित्ताने आज गिरगाव चौपाटीवर वाळूशिल्पकार लक्ष्मी गौड यांनी वाळूशिल्प साकारत टाकाऊपासून टिकाऊचा संदेश दिला. स्वच्छता पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतल्या सहा विभागांमध्ये आज खारफुटी स्वच्छता मोहीम तसंच महापालिकेतर्फे प्लास्टिकमुक्त मार्केट ही मोहीम राबवण्यात आली. रत्नागिरी शहरातही भाट्ये गावातल्या समुद्रकिनाऱ्यावर आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आलं. या अभियानात सांगली- मिरज रस्त्यावरची २० ठिकाणं निश्चित करून ही स्वच्छता मोहीम राबवत सात टन कचरा संकलित केला.