पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी आणि इतर तीन भाजपा आमदारांना आज विधानसभेतून ३० दिवसांसाठी किंवा अधिवेशन सुरू असेपर्यंत निलंबित केलं आहे. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये सरस्वती पूजेला झालेल्या विरोधाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून निवेदनाची मागणी केली.
यासंदर्भात अग्निमित्रा पॉल यांच्यासह भाजपच्या महिला सदस्यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. विधानसभेचे अध्यक्ष बिमोन बंदोपाध्याय यांनी हा प्रस्ताव स्वीकारला मात्र त्यावर चर्चा करण्याची परवानगी नाकारली. त्यानंतर विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी आणि भाजप आमदारांनी सभागृहातून बाहेर पडत विधानसभेबाहेर निदर्शने केली.
सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे मुख्य प्रतोद निर्मल घोष यांनी शुभेंदू अधिकारी आणि इतर भाजप आमदारांच्या वर्तनावर टीका करणारा ठराव मांडला आणि त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर सभागृहात आवाजी मतदानानं ठराव मंजूर करण्यात आला.