सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्याचा ठराव आज विधानपरिषदेत आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा ठराव मांडला. यासंदर्भात विरोधकांची बाजू ऐकून घ्यावी, असा आग्रह विरोधी पक्षांनी केला, मात्र अशा प्रकारच्या ठरावांवर कधीही चर्चा होत नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस म्हणाले. यावर विरोधकांनी हौद्यात उतरून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात घोषणा दिल्या आणि सभात्याग केला. या गदारोळातच विविध विषयांवरची कागदपत्रं सभागृहासमोर ठेवण्यात आली.
विरोधकांच्या सभात्यागानंतर गोऱ्हे यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. या विषयावर झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत दानवे अनुपस्थित होते, आपल्याकडून झालेल्या वर्तनाबाबत कोणतीही अपराधीपणाची भावना त्यांच्या वर्तनात नव्हती. याला आळा न घातल्यास महिलांना असुरक्षित वाटेल, असं वातावरण निर्माण होईल. ते होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं.
निलंबनाचा निर्णय हा एकांगी आणि अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. हा आपल्या स्वातंत्र्यावर हल्ला असून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली.