वीर बालदिवस हा देशातल्या नागरिकांसाठी राष्ट्रीय प्रेरणा दिवस असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. देशापुढं इतर काहीही महत्त्वाचं नाही हीच साहेबजाद्यांच्या बलिदानाची शिकवण असल्याचं ते म्हणाले.
सुपोषित ग्राम पंचायत योजनेचा प्रारंभ प्रधानमंत्र्यांनी यावेळी केला. पोषण आहाराशी संबंधित सेवा सुविधा सामाजिक योगदानातून ग्रामपंचायत पातळीवर उपलब्ध करुन देणं हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे.
वीर बालपुरस्कार विजेत्या मुलांशी या कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला. तसंच नंतर झालेल्या संचलनाला हिरवा झेंडा दाखवला. आणि मानवंदना स्वीकारली. विविध राज्यांच्या पारंपरिक समृद्धीचं दर्शन घडवणारी वेशभूषा केलेल्या मुलांची पथकं आणि चित्ररथ या संचलनात सहभागी झाले होते. देशभरातून सुमारे तीन हजाराहून अधिक मुलं या सोहळ्यात सहभागी झाली होती.
सांगली शिक्षण संस्थेच्या पथकानं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत लेझीम कलाप्रकाराचं प्रात्याक्षिक सादर केलं. संस्थेतल्या १८ विद्यार्थिनी सह ४ वादक, १ व्यवस्थापक आणि १ संघ प्रमुख अशा २४ जणांच्या संघाने हे प्रात्यक्षिक यशस्वी केलं.
वीर बाल दिनानिमित्त देशभरांत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. MyGov आणि MyBharat पोर्टलद्वारे ऑनलाइन प्रश्नमंजुषा तसंच इतर स्पर्धांची मालिका आयोजित करण्यात येणार आहे. शाळा, बाल संगोपन संस्था आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये कथाकथन, निबंधस्पर्धा आदी अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. या बाल वीरांच्या स्मृतीला देशात सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहेबजादे यांच्या प्रतिमेला फुलं अर्पण करून अभिवादन केलं.