गेले नऊ महिने अंतराळ स्थानकात अडकून पडलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आज पहाटे स्पेसएक्स क्रू ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून पृथ्वीवर परतले. त्यांचं स्पेसएक्स कॅप्सूल पॅराशूटच्या मदतीनं मेक्सिकोच्या आखातात टालाहासीच्या किनाऱ्याजवळ उतरलं. यासोबतच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरचे नासाचे निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे अंतराळवीरही परत आले आहेत.
गेल्या जूनमध्ये केवळ ८ दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेल्या, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना २८६ दिवस अंतराळात घालवावे लागले. दीर्घकाळ अंतराळात राहिल्यामुळे हाडांची घनता आणि स्नायूंची ताकद कमी झालेली असते. त्यांना आता पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी आणि इतर गोष्टींशी जुळवून घेता यावं याकरता ४५ दिवसांचा कार्यक्रम आखला आहे.