ऊस उत्पादक शेतकऱ्यांची; मुकादम, वाहतुकदार यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी यंदाच्या गाळप हंगामात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पुण्यातील साखर आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. कार्यकारी संचालक आणि खाजगी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत दक्षता घ्यावी असं त्यांनी सांगितलं.
ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी केल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक उपसंचालक विश्वास देशमुख यांनी केलं आहे. ऊस तोडणी मजूर आणि मुकादम, वाहतूक कंत्राटदार यांच्याकडून ऊस तोडणी करताना विविध कारणं सांगून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून रोख पैशांची अथवा अन्य वस्तू, सेवा यांची मागणी केली जाते. मागणीप्रमाणे पैसे दिले नाही तर ऊस तोडणीस टाळाटाळ केली जाते किंवा ऊस योग्य प्रकारे तोडला जात नाही अशा प्रकारच्या तक्रारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून वारंवार होत आहेत.