विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात विविध निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी तसंच निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत. आचारसंहिता संपेपर्यंत परवानाधारकांना शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. या काळात धरणं आंदोलन, मोर्चा, निदर्शनं, उपोषण करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
मुंबईत आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरु आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत बृहन्मुंबई महानगर पालिकेनं सुमारे ७ हजार ३८९ भित्तीपत्रकं, फलक, झेंडे आदी अनधिकृत प्रचार साहित्य हटवलं आहे.
निवडणूक काळात कुठंही गैरप्रकार घडू नयेत यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. निवडणूक आचारसंहितेसंबंधीची कारवाई म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागानं रायगडमध्ये २ लाख ७१ हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विधानसभा निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल सज्ज झाल आहे. दारुसह इतर अंमली पदार्थाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्ह्यात तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासनही सज्ज झालं आहे. जिल्ह्यातल्या निम्म्या मतदान केंद्रावर वेब कास्टिंग केलं जाणार आहे. त्या व्यतिरिक्त गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज तसंच परळी मतदान केंद्रासह ९६ संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.
सांगली जिल्ह्यातही आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. जिल्ह्यातल्या सर्व मतदारसंघातल्या शासकीय इमारती तसंच मालमत्तेच्या आवारातले जाहिरात फलक, भित्तीपत्रकं, भिंतीचित्र, झेंडे इत्यादी प्रचारसाहित्य हटवण्यात आलं आहे.