अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या भरमसाठ व्यापार टेरिफमुळे जागतिक मंदीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी अमेरिकी शेअर बाजार कोसळला. २०२० च्या कोविड साथीनंतर ही एका दिवसातली सगळ्यात मोठी घसरण ठरली. नॅसडॅक निर्देशांकामधे सहा टक्के घसरण झाली. या मंदीचे पडसाद आशियातल्या प्रमुख शेअर बाजारात उमटले. जपान, कोरियाच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. युरोपातल्या जर्मनी, फ्रान्स आणि लंडन बाजारांच्या निर्देशांकातही घट झाली.
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज ९३१ अंकाची घसरण झाली आणि तो ७५ हजार ३६५ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३४६ अंकांची घसरण नोंदवत २२ हजार ९०४ अंकांवर बंद झाला. जागतिक शेअर बाजारातल्या मंदीचे पडसाद आज देशातल्या शेअर बाजारात उमटले. धातू, भांडवली वस्तू, तेल आणि वायू तसंच औद्योगिक क्षेत्रातल्या कंपन्यांना या मंदीचा फटका बसला.