राज्याची सध्याची स्थिती गंभीर असून ती बदलण्यासाठी सत्ताबदलाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे राज्याला पूर्वपदावर आणण्याची ताकद असणाऱ्यांना जनतेनं आपला कौल द्यावा आणि ती ताकद फक्त महाविकास आघाडीत आहे, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. बारामतीतल्या गोविंद बाग इथं ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात परिवर्तन आणण्याचा आणि राज्याच्या नागरिकांच्या जीवनात सुधारणा करण्याचा निर्धार आज पाडव्याच्या दिवशी करायचा आहे, असं त्यांनी सांगितलं.
प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचा, राज्याची आर्थिक स्थिती बिघडल्याबाबतचा निष्कर्ष गंभीर आहे. सत्ताधाऱ्यांनी वेळीच याकडे लक्ष न दिल्याचा हा परिणाम आहे, असा आरोप पवार यांनी केला. केंद्र सरकारच्या अर्थ विभागाच्या मानांकनात जे राज्य पहिल्या क्रमांकावर होतं, ते आज पहिल्या पाचातही दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली.
सध्या राज्यात विमानाने फॉर्म पोहोचवल्याच्या गोष्टी ऐकायला मिळत असल्याचं सांगून, सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारांना अर्थसहाय्य देण्यासाठी पोलीस दलाच्या गाड्या वापरल्या जात आहेत, असं त्या विभागातल्या अधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे, असा आरोप शरद पवारांनी केला.