देशात युरिया खतांचा तुटवडा नाही. नफा मिळवण्यासाठी बाजारात युरियाची अनावश्यक टंचाई निर्माण करणाऱ्यांवर राज्य सरकारांनी कारवाई करावी, असं आवाहन आज केंद्रीय रसायन आणि खते मंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत केलं. समाजवादी पार्टीचे खासदार आनंद भदौरिया यांनी उत्तर प्रदेशात युरिया खतांचा तुटवडा असल्याचा दावा केला. मात्र, तो नड्डा यांनी फेटाळून लावला. युरिया खतांचा पुरवठा योग्य रितीने होत असून त्याचे तपशील मंत्रालयाकडे उपलब्ध आहेत, असंही नड्डा यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांना वेळेवर पुरवठा करता यावा यासाठी तारीखवार धोरण आखण्यात आलं असून यावर जिल्हा दंडाधिकाऱ्यांची देखरेख असते, अशी माहिती नड्डा यांनी यावेळी दिली.
Site Admin | February 7, 2025 2:27 PM | जे पी नड्डा | युरिया
युरियाची अनावश्यक टंचाई निर्माण करणाऱ्यांवर राज्य सरकारांनी कारवाई करावी – जे. पी. नड्डा
