राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं आज जालना जिल्ह्यात वडीगोद्री इथं ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी ओबीसींच्या २९ टक्के आरक्षणाला कुठंही धक्का लागणार नाहीं याबाबत राज्य सरकारनं लेखी आश्वासन द्यावं, आणि मराठा कुणबी म्हणून दिलेली ५७ लाख प्रमाणपत्रं रद्द करावीत, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली. या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा समावेश होता.
यावेळी गिरीश महाजन यांनी हाके यांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं करून दिलं. ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही हे सरकारनं स्पष्ट करावं, असं हाके यावेळी म्हणाले. मुंबईला चर्चेसाठी येण्याचं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं. चर्चा करून प्रश्न सुटेल, असं ते म्हणाले. मात्र आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत उपोषण सुरुच राहील. चर्चेसाठी आमचं शिष्टमंडळ येईल, असं हाके म्हणाले.
लेखी आश्वासन आणि प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी नवनाथ वाघमारे यांनी महाजन यांच्याकडे केली.