नववर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध भागात अवैध वाहतूक तसंच अवैध मद्यविक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत ३१ डिसेंबरपर्यंत विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. कोणत्याही अनुज्ञप्तीमध्ये विना परवाना मद्यविक्री किंवा अल्पवयीन तरुणांना मद्य उपलब्ध होत असल्यास, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कडक कारवाई केली जाणार आहे. तसंच नागरिकांनादेखील काही तक्रारी असल्यास विभागाशी संपर्क करावा, असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागानं केलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातही राज्य उत्पादन शुल्क विभागाची, भरारी पथकं विविध हातभट्टी ठिकाणं, अवैध मद्यविक्री केंद्रावर छापे टाकून कारवाई करत आहेत.
दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यात अवैध विक्री, मद्यनिर्मीती तसंच वाहतुक प्रकरणी गेल्या १ मार्चपासून आतापर्यंत विशेष मोहीम राबवून २ कोटी २८ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून १ हजार २२९ व्यक्तींवर गुन्हे नोंदवले आहेत.