टोरेस सारख्या गुंतवणूक कंपन्यांकडून देण्यात येणारं मोठा व्याज परतावा देण्याचं आश्वासन हा ९९ टक्के प्रकरणांमध्ये घोटाळा असतो, त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या गुंतवणूक करू नये, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.
शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे मात्र लादायचा नाही, असं सांगत विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत चर्चेतून मार्ग काढून या महामार्ग उभारला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. या महामार्गाविरोधात कोल्हापुरातले शेतकरी आंदोलन करत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासनाची भूमिका मांडली.
पीओपी मूर्ती बंदीच्या विरोधात आणि याबाबत स्पष्टता यावी यासाठी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, या समितीचा अहवाल येईपर्यंत पीओपी मूर्तींसाठी परवानगी देण्याची विनंती न्यायालयाला करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्ताव मांडत याबाबत शासनाची भूमिका मांडण्याची मागणी केली, त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.
राज्य परिवहन महामंडळामार्फत भाडेतत्वावर बसगाड्या घेण्यासाठी निविदा प्रक्रियेचे कार्यादेश एसटी महामंडळाच्या स्तरावर संगनमत करून काढण्यात आले आहेत. या प्रकाराची एका महिन्यात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काँग्रेसचे राजेश राठोड यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.