भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आपल्या स्पेडेक्स मोहीमेअंतर्गत काल श्रीहरीकोटा इथल्या उपग्रह प्रक्षेपक तळावरुन दोन उपग्रह अवकाशात सोडले. या मोहिमेअंतर्गत अंतराळात दोन उपग्रहांची जोडणी अर्थात डॉकिंग करण्यात येणार आहे. काल एसडीएक्स 01 आणि एसडीएक्स 02 हे दोन्ही उपग्रह पृथ्वीपासून काही अंतरावर आपापल्या कक्षांमध्ये स्थिरावले. येत्या काही दिवसात दोन्ही उपग्रहांमधलं अंतर कमी होईल आणि त्यानंतर डॉकिंगची प्रक्रिया सुरू होईल, असं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं.
चांद्रयान मोहीम आणि भारतीय अंतराळ स्थानकासारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमांसाठी स्पेडेक्स मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या मोहीमेच्या यशानंतर, अंतराळात दोन उपग्रह एकमेकांशी जोडणं अथवा विलग करण्याचं तंत्रज्ञान वापरणारा भारत जगातला चौथा देश ठरेल.
या कामगिरीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इस्रोच्या चमूचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही इसरोच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला बळ देणारी ही कामगिरी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.