स्पेनमधील वॅलेन्शिया प्रदेशातील पूरस्थिती हाताळण्यासाठी स्थानिकांच्या रोषानंतर प्रधानमंत्री पेद्रो सांचेझ यांनी आणखी पाच हजार सैनिक आणि पाच हजार पोलिस अधिकारी तसंच नागरी रक्षकांना तैनात केलं आहे. दरम्यान सतराशे सैनिक याआधीच शोध आणि बचाव कार्य करत आहेत. भूमध्य समुद्रावरील हवामानाच्या परिस्थितीमुळे स्पेनमध्ये काही तासांत झालेल्या अभूतपूर्व पावसानंतर आलेल्या पुरामध्ये आतापर्यंत 211 लोकांचा बळी गेला असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. या पुरामध्ये शहरांमधील पुल वाहून गेले असून सर्वच रस्त्यांवर चिखल झाला आहे; तसंच वाहून आलेल्या गाड्यांचे ढीग लागले आहेत. लोकांना पिण्याचं पाणी उपलब्ध होत नसून घरं मातीत गाडली गेल्यामुळे लोक आपल्या घरांमध्येही जाऊ शकत नसल्याची स्थिती आहे. हताश लोक अजूनही त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. हा पूर युरोपमधला शतकातला सर्वात भीषण पूर असल्याचं वर्णन केलं जात आहे.