दक्षिण कोरियामधे अध्यक्ष यून सुक योल यांच्यावर महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव विरोधी पक्षसदस्यांनी संसदेत मांडला आहे. यून सुक योल यांनी काल अचानकपणे लष्करी राजवट लागू केली होती. त्याबद्दल त्यांच्यावर टीकेचा वर्षाव झाला. हजारो नागरिक निदर्शनं करीत रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे अवघ्या ६ तासात यून यांनी निर्णय मागे घेतला. या महाभियोग प्रस्तावावर येत्या शुक्रवारी मतदान होईल, असं विरोधी पक्ष सदस्य किम योंग मिन यांनी सांगितलं. ६ राजकीय पक्ष या प्रस्तावाला पाठिंबा देणार असल्याचं ते म्हणाले. प्रस्ताव मंजूर होण्यासाठी किमान दोन तृतीयांश सदस्यांची मतं आवश्यक आहेत. ३०० सदस्यांच्या सभागृहात सत्ताधारी पक्षाचं संख्याबळ १०८ आहे. महाभियोग प्रस्ताव मंजूर झाल्यास यून यांना पदावरुन निलंबित केलं जाईल आणि संवैधानिक न्यायालयात त्यांच्या बडतर्फीबाबतचा निर्णय होईल.
दरम्यान, दक्षिण कोरियातल्या भांडवली बाजराचा निर्देशांक कोस्पी आज कालच्या तुलनेत दीड टक्के घसरुन बंद झाला.