डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशभरात आतापर्यंत पाच अर्भकांना एचएमपीव्ही विषाणूची लागण

देशात पाच रुग्णांना एच एम पी व्ही या विषाणूची लागण झाली आहे. यामध्ये कर्नाटकात तीन आणि आठ महिन्यांच्या अर्भकांना, गुजरातमध्ये अहमदाबाद इथं दोन महिन्याच्या बालकाला, तर तामिळनाडूमध्ये चेन्नई आणि सालेम इथं या विषाणूचे रुग्ण सापडले असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

 

कर्नाटकात आढळलेल्या तीन महिन्याच्या अर्भकाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून, आठ महिन्याच्या अर्भकावर अद्याप उपचार सुरू आहेत.
दरम्यान, हा एक सामान्य श्वसन आजार असून, यात सर्दी आणि तापाची लक्षणं दिसून येतात. या आजाराचा विषाणू श्वसनमार्गाच्या वरील भागातल्या संसर्गास कारणीभूत ठरतो. या अनुषंगानं केंद्रीय आरोग्य विभागानं एक परिपत्रक जारी केलं आहे. हा कोणता नवीन विषाणू नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून, नाहक भीतीचं वातावरण निर्माण करण्याची गरज नसल्याचं, आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिकांनी खोकला किंवा शिंक येतांना रुमालाचा वापर करावा,

 

सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळावं, सॅनिटायझर किंवा साबणाने हात स्वच्छ धुवावेत, हस्तांदोलन टाळावं, तसंच आजारी लोकांच्या संपर्कात येणं टाळावं, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत या संसर्गाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं राज्य आरोग्य सेवा संचालनालयानं कळवलं आहे. नागरिकांनी याबाबत घ्यावयाच्या काळजीसंदर्भातल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे.
दरम्यान, या आजारासंदर्भात राज्यसरकार लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले:
‘‘प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाहीये. यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे. पुन्हा त्या व्हायरसचा चंचूप्रवेश होताना दिसतो आहे. यासंदर्भात जी काही ॲडव्हायजरी आहे, ती आम्ही लवकरच जारी करू.’’

सर्वाधिक वाचले

सर्व पहा