रशियन सैन्यात आतापर्यंत ९१ भारतीय नागरिक भरती झाल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली. यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला असून १४ जणांना सेवामुक्त करण्यात आल्याचं तर ६९ भारतीय सेवामुक्ती मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
यासंदर्भात आपण रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी अनेक वेळा चर्चा केल्याचं ते म्हणाले. रशियन सैन्यात असलेल्या भारतीयांना लवकरच सेवामुक्त केलं जाईल असं आश्वासन रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांना त्यांच्या रशिया दौऱ्यादरम्यान दिल्याचं त्यांनी सदनात सांगितलं.