स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२४ च्या सॉफ्टवेअर एडिशनचा आज समारोप होत आहे. मुंबईत संध्याकाळी समारोप सत्र होईल. मुंबईत हॅकेथॉन चं आयोजन एल एन वेलिंगकर व्यवस्थापन विकास आणि संशोधन संस्थेनं केलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, विश्लेषण, प्रतिमा विश्लेषण आणि समस्या या विषयांवरल्या स्पर्धांमध्ये ३४ संघ सहभागी झाले होते.
पुण्यात हॅकेथॉनचं आयोजन एमआयटी कला, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने केलं होतं. नागपूरमध्ये जी एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात हॅकेथॉन आयोजित केलं होतं.
स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची अंतिम फेरी काल देशभरातल्या ५१ केंद्रांवर सुरु झाली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दूरस्थ माध्यमातून या हॅकेथॉनचं उद्घाटन केलं होतं. तसंच, हॅकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी प्रधानमंत्र्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. देशातले युवक सरकारला साथ देत देशासमोरच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी काम करत आहेत, त्यामुळे भारत विकसित होण्याच्या मार्गावर आहे, याबद्दल आपल्याला विश्वास वाटतो असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं.