सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची अंतिम फेरी आज देशभरातल्या ५१ केंद्रांवर सुरु झाली. यात राज्यातल्या चार केंद्रांचा समावेश आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दूरस्थ माध्यमातून याचं उदघाटन केलं. देशातले विद्यार्थी हेच विकसित भारताचे चालक असल्याचं प्रधान यांनी यावेळी सांगितलं. युवावर्गाची बुद्धिमत्ता, व्हिजन, मेहनत, उत्साह, नेतृत्वगुण आणि नवोन्मेष यामुळे २१ व्या शतकातली ज्ञानाधारित अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उदय होईल आणि अनेक विकसनशील देशांसाठी ते आदर्श विकास प्रारूप ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आज होत असलेल्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातल्या मुंबई, पालघर, बुलडाणा, नांदेड, कोल्हापूर, नाशिक धुळे, पुणे, नागपूर, वर्धा, सोलापूर, ठाणे, सांगली आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधल्या सुमारे तेराशे विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात मुंबईतल्या वेलिंगकर संस्थेतले ३४ संघ गृह मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सहा समस्यांचं निराकरण करण्यासाठी काम करत आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी साडेचार वाजता हॅकेथॉनमधल्या सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.