ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक दिवंगत श्याम बेनेगल यांच्या पार्थिवावर आज मुंबईच्या शिवाजीपार्क स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
शाम बेनेगल यांनी सामाजिक वास्तव आणि संवेदनशीलता यांचा सखोल वेध घेणारे चित्रपट केले. त्यांचं काम भारतीय सिनेमाला समृद्ध करणारं होतं, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शाम बेनेगल यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.त्यांच्या कामाला पुढील पिढ्यांचीही प्रशंसा मिळत राहील, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
बेनेगल यांच्या निधनामुळे चित्रपट निर्मात्यांना प्रेरणा देणारा एक प्रतिभावंत निर्माता – दिग्दर्शक आपण गमावला आहे अशा शब्दात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शोक भावना व्यक्त केल्या.
भारतीय चित्रपट सृष्टीत वास्तववादी चित्रपट निर्मितीचे समांतर पर्व आणणारे श्याम बेनेगल अजरामर राहतील अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेनेगल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
बेनेगल यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला सोनेरी अध्याय संपला आहे”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.