केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान तसंच गृह राज्यमंत्री बंडी संजय कुमार यांनी तेलंगणमधल्या महापुरामुळं संकटात सापडलेल्या खम्मम जिल्ह्यातल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. या बाबत शिवराज सिंग चौहान यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्याशीही चर्चा केली. केंद्र सरकारनं आंध्र आणि तेलंगणासाठी ३ हजार ३०० कोटी रुपये दिल्याचा दावा आंध्र प्रदेश भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष डी. पुरंदरेश्वरी यांनी केला आहे.
भारतीय नौदलाच्या विभागीय तुकड्या आंध्र प्रदेशातल्या पूर बाधितांना आवश्यक ती सर्व मदत पोचवत आहेत. या मोहिमेसाठी नौदलाची हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली असून त्या माध्यमातून पूरग्रस्तांना खाद्यपदार्थ, पाणी तसंच औषधं पुरवली जात आहेत. पूरग्रस्त नागरिकांना स्थलांतरीत करण्याचं कामही वेगानं सुरु आहे.
दरम्यान, आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नुकतीच तिथल्या पूरग्रस्त भागाची हवाईमार्गे पाहणी केली असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.