प्रसिद्ध उद्योजक आणि एस्सार उद्योगसमूहाचे सह संस्थापक शशिकांत रुइया यांचं काल मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईत निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. दीर्घ आजारावर अमेरिकेत उपचार घेऊन ते महिनाभरापूर्वीच मुंबईत परतले होते. १९६९मधे त्यांनी आणि रवि रुइयांनी एस्सार उद्योगसमूहाची स्थापना केली. तेल, वायू उत्खनन तसंच उर्जानिर्मिती, बंदर आणि इतर उद्योगात एस्सार समूहाने मानाचं स्थान मिळवलं. रुईया यांनी अनेक समाजोपयोगी कार्यातही भरीव योगदान दिलं.
शशिकांत रुईया यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. रुईया यांची दूरदृष्टी, नेतृत्व आणि कल्पकता यामुळे देशातल्या उद्योगक्षेत्राचं रंगरूप बदललं अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी रुईया यांना आदरांजली वाहिली आहे.