आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर कालपासून राज्यात शारदीय नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. आता पुढचे नऊ दिवस देवीच्या विविध रुपांचं पूजन केलं जाईल. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, वणीची सप्तशृंगी आणि माहूरची रेणुका या राज्यातल्या साडेतीन शक्तीपीठांच्या मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाला घटस्थापनेनं प्रारंभ झाला. श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात छत्र चामरं ढाळंत, संबळाच्या कडकडाटात, ‘आई राजा उदो उदो’ च्या गजरात घटाची कल्लोळतीर्थापासून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. काल पहिल्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची पूजा श्रीमहालक्ष्मी रुपात बांधण्यात आली होती. श्री क्षेत्र माहूर इथंही अलंकार पूजा करण्यात आली. वणी इथल्या सप्तशृंगी देवीच्या मंदिरातही उत्साहात घटस्थापना करण्यात आली. राज्यात इतरत्रही ठिकठिकाणच्या देवी मंदिरांमध्ये उत्सव सुरु झाला आहे. घराघरातही विधिवत घटस्थापना करुन आदिशक्तीचा जागर आणि पूजन केलं जात आहे.
Site Admin | October 4, 2024 8:55 AM | Festival | Sharadiya Navratri | State